क्षितिजापाठी चालू आपण असे निरंतर
चार पावले बिलगून दिसतील सदा समांतर
हातांच्या स्पर्शांना सुचतील शब्द अवांतर
विरून जाईल दोघांमधले मौन हवेवर
तारका- जणू चकाकणारया परया निशाचर
करतील आगमन चहू दिशांनी आभाळावर
प्रतिबिंब झेलण्या अधीर आतूर आर्त सरोवर
नक्षत्रांनी सजेल सारी धरा नि अंबर
भेटेल ढगांच्या आड टांगला चंद्र अधांतर
त्या कातरवेळी ऐकू यावे स्तोत्र शुभंकर
ठेच लागली तरीही चालू घालून फुंकर
बहरेल पालवी उजाड वृक्षाच्या फांदीवर
जाऊ कुठून कोठे, ठाऊक नाही अंतर
त्या क्षितिजापाठी चालू आपण असे निरंतर