मांगल्याची प्रकाशकिरणे
उंबरठ्यात उमटली
प्रदक्षिणा तुळशीला घालून
झुळूक जराशी हसली
गारठली मंजिरी दवाने
भिजली पाने कोवळी
फांदीवर झुलता झुलता
चिमण्यांची मैफिल रंगली
भूपाळीच्या लहरींवर
फुलल्या गोकर्णाच्या वेली
तगरीच्या हाराने
देव्हाऱ्याची महिरप सजली
उदबत्तीच्या धुरात दरवळ
प्रसन्नता मोहरली
सुरात वाजे सनई
घंटा पहा कशी किणकिणली
लखलखणार्या निरांजनाची
ज्योत तेवली इवली
हात जोडुनी आर्त प्रार्थना
गाभार्यातून घुमली
No comments:
Post a Comment