Pages

Tuesday, 17 December 2019

सांभाळ स्वत:ला


ओळखले मी मलाच नाही, किती दिसांनी
केला अट्टाहासाने शृंगार कशाला?

प्रतिबिंबाची ओळख पटली जरा उशीरा
आठवणींचा जुनाट अत्याचार कशाला?

कधी नव्हे ते निष्पाप्याने तोंड उघडले
तोंड दाबुनी बुक्क्यांचा हा मार कशाला?

वारयाला सोसाट्याने चौफ़ेर फिरू द्या
उदबत्ती-गंधाला कारागार कशाला?

निरोप द्याया उंबरठ्यावर पाऊल अडले
विरहाचा अभिनय-अन सोपस्कार कशाला?

खुशाल जाऊ लांघून सीमा नात्यांचीही
शपथांचा अन वचनांचा बाजार कशाला?

ज्योतीभोवती मिणमिणता अंधार कशाला?
बुडणारयाला काडीचा आधार कशाला?

आधाराला कुणीच नाही म्हणून म्हणतो
होऊनी आधार स्वत:; सांभाळ स्वत:ला!


No comments:

Post a Comment