बिलगुनी बसले दवाचे थेंब पात्यावर पुन्हा
का पहाटे चंद्र ओला, कोरडा अन मी पुन्हा
डोह होता मेघवर्णी काल सांजेला जरी
उमटली स्वर्णाक्षरे हलकेच पाण्यावर पुन्हा
किलबिलाटाने सुरू झाल्या जिण्याच्या मैफिली
सूर-लहरी भैरवीच्या छेडील्या गेल्या पुन्हा
झाकिली स्वप्ने उद्याची काल ज्यांच्या आड त्या
पापण्यांची बघ कवाडे लागली उघडू पुन्हा
भूतकाळाच्या कुपीला दडवूनी उदरामध्ये
घेउनी स्वप्ने उद्याची आज अवतरला पुन्हा
शोधूनि पाहू पुन्हा पुन्हा तुझ्या पाऊलखुणा
भेटशील केव्हातरी अन बोलशील का तू पुन्हा?
No comments:
Post a Comment